उद्योजकतेच्या क्षेत्रात ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, श्री.सुनील चांडक यांनी ‘उद्योगी मन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक प्रामुख्याने उद्योजकीय मानसिकता तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. लेखकाचे मत आहे की तुम्ही मनाने तरुण असाल तर तुमचं व्यक्तिमत्व एक उद्योजक बनण्यासाठी अतिशय अनुकूल असू शकतं. मनाने तरुण असण्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही अजूनही अनेक अनभिज्ञ असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात. उद्योजकता हे जीवनातील सर्वात मोठे साहस आहे. हे तुम्हाला आयुष्यभर तरुण राहण्यास मदत करते आणि या प्रवासात उलगडणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल जिज्ञासा जागृत ठेवते. योग्य मानसिकतेने कोणीही त्यांच्या आवड, किंवा छंद या क्षेत्रात उद्योजकता शोधू शकतो, त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या क्षमता ओळखून त्यांचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे.
तुमची उद्योजकीय मानसिकता तयार करणे ही एक प्रक्रिया आहे. विशिष्ट फ्रेमवर्क, रणनीती लागू करून आणि स्वतःला समजून घेऊन ती तयार केली जाऊ शकते. हे पुस्तक तुम्हाला तुमच्यातील उद्योजक शोधण्यात मदत करेल आणि तुमच्यामध्ये तुमचा उद्योजकीय प्रवास सुरू करण्यासाठी प्रेरणा निर्माण करेल.
१९८५ पासून कार्यरत उद्योजक, सुनिल चांडक यांनी ६८ हजार जणांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देऊन, उद्योजक बनविले आहे. लेखन, प्रशिक्षण व उद्योजकतेतील त्यांच्या योगदानाचा ५ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान व महाराष्ट्र शासनाच्या शेतीमित्र पुरस्काराने गौरव झालेला आहे. उद्योजकतेविषयक विविध सेमिनार्स, वर्कशॉप्स, प्रशिक्षण कार्यक्रम व मुलाखती याव्दारे त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन व प्रभावित केले आहे.